व्यक्तिगत माहिती

श्री. सुधीर मुनगंटीवार

    वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री, महाराष्ट्र राज्य.
    पालक मंत्री - चंद्रपूर आणि वर्धा

महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष, संघाच्या कार्यकर्त्यांशी एकरूप होणारे नेते श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा जन्म ३० जुलै १९६२ रोजी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात झाला. उच्चविद्याभूषित सुधीरजी यांनी एम.कॉम., एल.एल.बी., एम.फिल., डी.बी.एम., बी.जे., डी. लिट. इत्यादी पदव्या संपादन केल्या आहेत. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि सार्वजनिक जीवनाला आरंभ केला. सरदार पटेल महाविद्यालयाच्या छात्रसंघाची निवडणूक जिंकून ते सरचिटणीस पदी निवडून आले. यानंतर लवकरच म्हणजे १९८१ मध्ये ते चंद्रपूर शहर भाजपाचे चिटणीस झाले आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात झाली. आता चंद्रपूरच्या लोकांच्या समस्या सोडवणे हेच आपले ध्येय मानून त्यांनी तेथील अनेक सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतले. त्यांचे चंद्रपूरचे सहयोगी असे म्हणतात की, ‘सतत लोकांच्या संपर्कात असणारा व कामामध्ये स्वतःला झोकून देणारा हा एकमेव नेता आहे.’

चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे सतत चार वेळा राज्य विधिमंडळात प्रतिनिधित्व करणारे सुधीरजी १९९५ मध्ये प्रथमच विधानसभेवर निवडून गेले. यावेळी त्यांनी ५५ हजाराचे विक्रमी मताधिक्य मिळविले होते. लगोलग ते भाजपा-सेनेच्या युती सरकार मध्ये पर्यटन आणि ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री देखील झाले. विधीमंडळाचे १९९८ सालचे उत्कृष्ट वक्त्याला दिले जाणारे पारितोषिक सुद्धा त्यांना मिळाले आहे. याखेरीज समाजातील अंध-अपंग व्यक्तींच्या मदतीसाठी वैधानिक लढा देणाऱ्यास दिला जाणारा जी.एल.नार्देकर स्मृती पुरस्कार सुधीरजीना मिळाला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी असलेले गोंडवन विद्यापीठ उभे करण्यात सुधीरजींचा मोठा वाटा आहे. साल २००९ पासून एप्रिल २०१३ पर्यंत ते महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष होते.

विशेष प्रकल्प

  • डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक चंद्रपूर या संस्थेचे अध्यक्ष या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन वाचनालय.
  • सन १९९९ मध्ये या संस्थेच्या माध्यमातून चंद्रपूर शहरात निशुल्क सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालयाचा उपक्रम सुरु केला.
  • चंद्रपूर शहरात वाचनालय संस्थेची अद्ययावत वास्तूत ५००० वर ग्रंथसंपदा असलेले ग्रंथसमृद्ध वाचनालय वाचकांच्या सेवेत रुजू. या इमारतीत सामाजिक अर्थसहाय्याच्या व संजय गांधी निराधार योजना व गरीब गरजूंसाठीच्या जिवनदायी आरोग्य योजना या योजनांची माहिती लाभ्यार्थांना मिळावी, त्याचा सहज लाभ घेता यावा यासाठी माहिती व मार्गदर्शन केंद्र जनतेच्या सेवेत रुजू, गरीब व गरजू मुलींसाठी मोफत संगणक प्रशिक्षणाची सोय उपलब्ध.
  • अशाच पद्धतीने माहिती व मार्गदर्शन केंद्र बल्लारपूर शहरातही जनतेच्या सेवेत रुजू.
  • संस्थेच्या माध्यमातून अपंग मार्गदर्शन मेळावे, बचतगट महिलांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन.
  • संस्थेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पायाने अपंग असलेल्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर तीन चाकी सायकलींचे वितरण.
  • संस्थेच्या माध्यमातून नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन, त्या माध्यमातून रुग्णांना मोफत चष्मे वाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया.
  • संस्थेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस, मुल, चिचपल्ली, धाबा येथील नागरिकांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध आणि नव्याने ९ रुग्णवाहिकांना मंजुरी.
  • संस्थेतर्फे अपंगांसाठी योजनांची माहिती देणारी “आधार अपंगाचा”, “आधारगाथा” तसेच संजय गांधी निराधार योजना तसेच जिवनदायी आरोग्य योजना आदी योजनांची माहिती देणारी “प्रकाश वंचितांसाठी” या पुस्तकाचे प्रकाशन.

विशेष उपलब्धी

  • नागपूर विद्यापीठाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि अमरावती विद्यापीठाला वैराग्यमूर्ती गाडगेबाबांचे नाव देण्याच्या संसदीय संघर्षाला यश.
  • १९९५ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी “जर आमदारकीच्या कार्यकाळात बल्लारपूर तालुक्याची निर्मिती करू शकलो नाही तर पुन्हा निवडणूक लढणार नाही” अशी प्रतिज्ञा घेऊन त्यासाठी केलेल्या संघर्षाला यश, १९९९ मध्ये बल्लारपूर तालुक्याची निर्मिती.
  • उपेक्षित मातंग समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, व आर्थिक विकासासाठी क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग आयोग स्थापण्यास राज्य सरकारला भाग पाडले. आयोगाने शासनाला केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही सुरु.
  • विधानसभेच्या माध्यमातून सतत संसदीय संघर्ष करून सं २००० मध्ये राज्य सरकारला रोजगार व स्वयंरोजगाराचे धोरण जाहीर करण्यास भाग पाडले.
  • १ जानेवारी १९९८ रोजी राज्यात स्वतंत्र खनिज विकास मंत्रालय सुरु करण्यास राज्य सरकारला भाग पाडले.
  • विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र मार्कण्डेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे पूर्ण करण्यासाठी राज्यातील सर्व विधानसभा सदस्य यांच्याकडून स्थानिक विकास निधीतून निधी मिळण्यासाठी नियोजन विभागाकडून विशेष परिपत्रक काढून, त्यामाध्यमातून, निधी मागवून या परिसरात रस्ते, विद्युत व्यवस्था, पाणी पुरवठा योजना, शौचालय बांधकाम, धर्मशाळा बांधकाम आदी विकास कामांची पूर्तता, विशेष बाब म्हणून करण्यात आलेल्या राज्यातील हा पहिला यशस्वी प्रयत्न ठरला.
  • चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्याच्या मागणीसाठी केलेल्या संसदीय संघर्षाला यश, गोंडवाना विद्यापीठ जनतेच्या सेवेत रुजू.
  • महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा.सा. कन्नमवार यांचे भव्य स्मारक मुल (जि.चंद्रपूर) येथे उभारण्यासाठी शासनाची मंजुरी मिळविण्यात यश.
  • राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील विधवा महिलांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याच्या रकमेत दुपटीने वाढ करण्यात यश – १० हजार रु. अर्थसहाय्य २० हजार रु. करण्याचा निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडले.
  • राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या परिरक्षण अनुदानामध्ये विद्यमान अनुदानाच्या ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यास राज्य सरकारला भाग पाडले – विधानसभेत अशासकीय विधेयकाच्या माध्यमातून घडवून आणलेल्या चर्चेचे फलित.